सतराव्या शतकात म्हणजेच शिवकालात न्यायव्यवस्थेचा एक भाग म्हणजे दिव्य. विश्वसनीय लेखी वा तोंडी पुरावा उपलब्ध नसल्यास आरोपीला दिव्य करावे लागे. दिव्य म्हणजे आरोपीने काही कठीण (शकत्यो शारीरीक) परीक्षेतुन जायचे. दिव्याच्या सफलतेवर न्यायदान होत असे. तसे पाहीले तर ही दिव्ये आणि अचूक न्यायाचा संबंध नाहीच पण ‘सत्यमेव जयते’ या सूत्रानुसार आणि देवावरील/खरेपणावरील श्रध्देपोटी हा दिव्याचा मार्ग निघाला असावा. पुराव्याअभावी तंटा अडकला की दिव्य करावे लागे पण नंतर विश्वसनीय पुरावा मिळाल्यास गोतसभा निर्णय बदलत असे.
दिव्य करायलाही विशिष्ट पध्द्दत आखली होती. दिव्यासाठी वेळ व ठिकाण ठरवले जाई. गोतसभेच्या आणि गावक-यांच्यां उपस्थितीत दिव्य होई. दिव्य देणारा आणि करणारा दोघांनाही दिव्यापूर्वी १-२ दिवस उपवास करावा लागे. ठरलेल्या वेळी सर्वांच्या उपस्थितीत होम केला जाई. देवतांचे पूजन, घटस्थापना होई. ज्या संबंधी दिव्य करायचे त्या मजकुराची एक पत्रीका दिव्य करणा-याच्या कपाळाला बांधत. मग तो दिव्य करण्यास तयार होई. या सर्व पुजापठनाचा हेतू असा की एक धार्मीक वातावरणनिर्मीती होई. त्या काळात सत्य आणि धार्मीकतेचा जवळचा संबंध होता.
दिव्याचे प्रकार
१. अग्निदिव्य
२. जलदिव्य
३. तंदूलदिव्य
४. वातीची क्रिया
अग्निदिव्य
तयारी
अग्निदिव्यात लोखंडाचा एक गोळा ३ वेळा लालबुंद तापवून पाण्यात घालुन शुध्द करुन घेत. १६ अंगुले व्यासाची ९ मंडले आखली जात. ९ व्या मंडलात कुंड बनवत व त्यात कणिक ठेवत. दिव्य करणा-याची नखे कापुन त्याचे हात स्वच्छ धुवुन त्याच्या हस्तरेषा मांडून ठेवत. पंच गोळा नीट तापलाय का याची खातरजमा करुन घेत.
दिव्याची क्रिया
दिव्य करणारा पहिल्या मंडलात उभा राही. त्याच्या हातात ७ पिंपळाची पाने ठेउन त्यावर तप्त गोळा ठेवायचा. मग त्याने ७ मंडले चालत जाउन ९ व्या मंडलात तो गोळा टाकायचा. तप्त गोळ्याने कुंडातली कणित पेट घेई.
न्यायनिवाडा
दिव्यानंतर त्याची हात तपासणी होई. हात भाजलाय का हे पाहीले जाई. जर प्रथमदर्शनी कळाले नाही तर दुस-या दिवशा हस्तरेषा पाहुन त्या आधीच्या मांडणीसोबत ताडून पाहत. जर भाजल्याने, फोड आल्याने त्या जुळल्या नाहीत तर दिव्य देणारा हरला. जर हाताला अग्निस्पर्श झाला नाही हे सिध्द झाले तर दिव्य देणारा जिंकला. त्यानुसार न्यायनिवाडा होई. संत तुकाराम हे दिव्य करताना ‘तु माझा सांगांती’ या मालिकेत दाखवले आहे.
Link : http://youtu.be/qf72NvdjSdw (starts at 8:18)
जलदिव्य
तयारी
हे दिव्य नदीकाठी करावयाचे दिव्य. तीर-कमान पुजन करुन उपवास केलेल्या ब्राह्मण वा क्षत्रियास दिले जाई. त्याने सरळ मार्गावर ३ तीर सोडायचे. हे तीर खाचखळग्यात, चिखलझाडीत सोडू नयेत. तीरंदाजाजवळ २ जवान तैनात रहात. दिव्य देणारा पाण्यात उभा राही. पाणी बेंबीला लागेल इतक्या पातळीवर उभे रहावे. त्याजवळ तरबेज पोहणारा कोळी उभा राही. दिव्य देणारा घाबरला, बुडू लागला तर त्याला बाहेर काढायची जबाबदारी त्यावर असे.
दिव्याची क्रिया
दिव्य देणा-याने पाण्यात बुडी मारावी. मग तिरंदाजाजवळ असणा-या जवानांनी पळावे. पळत जाउन ३ तीरांपैकी मधला तीर उचलून आणावा. ते परत तिरंदाजाजवळ येईपर्यंत दिव्य देणा-याने पाण्याच्या आतच रहावे.
न्यायनिवाडा
जर दिव्य देणा-याचे कान,नाक,डोळे, तोंड तीर आणणा-या जवानांना दिसले तर दिव्य देणारा हरला. आणि जवान परत तिरंदाजाजवळ ईपर्यंत दिव्य देणारा पाणयातच राहिसा तर तो जिंकला. मग त्यानुसार न्यायनिवाडा होई.
तंदूलदिव्य
तयारी
ठरवल्यानुसार एखाद्या धातूचे (सोने, चांदी, तांबे) गोलाकार कडे बनवायचे. हे कडे तापवून तुपात अर्धे बुडेपर्यंत ठेवावे.
दिव्याची क्रिया
दिव्य देणा-याने हे कडे ‘अंगुष्टांगुलीयोगेन’ बाहेर काढुन दाखवावे.
न्यायनिवाडा
बोटाला फोड आला तर दिव्य देणारा हरला. त्यानुसार पुढे न्यायनिवाडा होई.
वातीची क्रिया
तयारी
दोन्ही पक्षांनी स्नान करुन यावे. पंच दोन्ही पक्षांना सारख्याच वजनाची कणीक आणि कापुस देत. कणकेचा दिवा करावा व कापसाची वात.
दिव्याची क्रिया
दोन्ही दिव्यात सारख्याच मापाचे तेल टाकुन दोन्ही दिवे एकदम प्रज्वलित करायचे. हे दोन्ही दिवे मग देवापुढे ठेवायचे.
न्यायनिवाडा
ज्या पक्षाचा दिवा आधी विझला तो पक्ष हरला. त्यानंतर दुसरा दिवा ३०० टाळ्या वाजेपर्यंत टिकला तर तो पक्ष जिंकला. जर तो आधीच विझला तर निर्णय व्हायचा नाही. निर्णय पुढे ढकलला जाई.
अशा प्रकारे गोतसभा पुराव्याअभावी अडलेल्या खटल्यांचा निकाल दिव्य घेउन करे. खटला जिंकणा-याला ‘जयपत्र’ मिळे तर हरणा-यास ‘यजितपत्र’ मिळे.
संदर्भ : शककर्ते शिवराय (लेखक- विजयराव देशमुख)
सदर लेख मी माझ्या gadkot.in ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आता गडकोट.इन डोमेन नसल्यामुळे इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
श्रीकांत लव्हटे | www.gadkot.in | इतिहासातील दुर्ग, दुर्गांतील इतिहास