सह्याद्रीचे सखे सोबती

आज ट्रेकचे फोटो पाहताना सह्याद्रीतल्या छोट्या सोय-यांवर लिहावेसे वाटले म्हणून ही छोटेखानी पोस्ट.

सह्याद्रीतल्या गडकोटांवर फिरताना बरेच लहान, मोठे, प्राणी-पक्षी दिसतात. ब-याच ट्रेकमध्ये आठवणीत राहतो गावातुन गडावर आपल्यासोबत आलेला कुत्रा !! आपले नी याचे नाते कसलेही नाही पण सुरवात ते शेवट आपल्यासोबत असतो. सह्याद्रीतल्या भटक्याला असा अनुभव आला नसेल असा क्वचितच. प्रचंडगडाच्या ट्रेकमध्ये हा असाच आमच्या सोबत आलेला अामचा डोंगरमित्र!!

प्रचंडगड ट्रेकचा सोबती

पावसाळ्यातल्या भ्रमंतीमध्ये हमखास दिसणारे पाहुणे म्हणजे खेकडे !! काळे, पांढरे, छोटे , मोठे, भरीव, दुधगे असे अनेक खेकडे दर्शन देतात. कर्नाळ्याच्या जंगलात, धबधब्याला पांढरे खेकडे फार. असाच एक खेकडा विसापूर किल्ल्याच्या माळरानावर दिसलेला. नांग्या हवेत उंचावून प्रतिकाराच्या पावित्र्यात उभा होता. त्याच्या जसे जवळ जाउ तसा त्या बाजुने तो नांगी फिरवत होता 🙂

विसापूर किल्ल्यावरचा खेकडा

पावसाळ्यात जसे खेकडे तसे हिवाळा-उन्हाळ्यात दिसतात ते जंगलातल्या पानांवर जाळे विणणारे कोष्टी! माझ्याकडे तसा DSLR वगैरे कुटूंबातील कॅमेरा नसल्याने त्यांचे काही चांगले फोटो मला मिळाले नाहीत. त्यातल्या त्यात हा सिध्दगडच्या वाटेवरच्या कोष्ट्याचा एक बरा फोटो आलाय.

सिध्दगडच्या वाटेवर दिसलेला कोष्टी

सह्याद्री फिरणे म्हणजे जंगल तुडवणे आलंच. जंगलातुन चालताना हमखास दिसतात ते सरडे. नशीब बलवत्तर असेल तर रंग बदलणारे सुध्दा! सरड्यांचा फोटो घेणे जरा अवघडच जरा हालचाल झाली की लगेच पळतात. मला ह्या कर्नाळा किल्ल्याच्या दरवाजाच्या चौकटीवर बसलेल्या सरड्याचे फोटो काढायला जास्त कष्ट लागले नाहीत पण त्याने मागे वळुन पाहण्यासाठी बराच खटाटोप करावा लागला. साहजिकच, त्याने काही वळून पाहीले नाही आणि याच फोटोवर समाधान मानावे लागले.

कर्नाळा किल्ल्याच्या दरवाजाच्या चौकटीवर बसलेला सरडा

सह्याद्रीच्या या मंडळीमध्ये किडे, पावसाळ्यातले गांडूळ, गोगलगाय, नाकतोडे, फुलपाखरे, मधमाश्या अशी वरीच छोटी मंडळी मी कॅमे-यात बंदीस्त केली आहेत. त्यातली काही निवडक छायाचित्रे ईथे देताय.

पाण्याच्या टाक्यातल्या मधमाश्या (कर्नाळा दुर्ग)
काळा किटक आणि हिरवी अळी (कोरीगड)
गोगलगाय (कर्नाळा)

तळटीप : मी प्राणिशास्त्रातील जाणकार नसल्याने सदर पोस्ट अभ्यासात्मक नाही.

सदर लेख मी माझ्या gadkot.in ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आता गडकोट.इन डोमेन नसल्यामुळे इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
श्रीकांत लव्हटे | www.gadkot.in | इतिहासातील दुर्ग, दुर्गांतील इतिहास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *