जावळीच्या मोरेंची बखर : सारांशलेखन

आजच्या धावपळीच्या जीवनात जून्या बखरी मिळवणे, त्या वाचणे, त्यातील वेगळी वाक्यरचना, शब्द समजुन घेत कालक्रमाने बखरीचा घटनाक्रम समजुन घेणे इतके सामान्याला जमणे कठीण. अशाने हा अमूल्य ठेवा लोप पावत जातो. म्हणून बखरीबद्दल उत्सुकता वाढावी, ज्यांना इच्छा असुनही वरील काही कारणांमुळे बखर वाचन जमत नाही त्यांच्यासाठी हा सारांश रुपी लेख लिहीतोय. सारांश लेख वाचून इतिहासाबद्दल आत्मियता, उत्सुकता वाढून पुर्ण बखर, इतर जुने साहित्य वाचनाची प्रेरणा मिळावी ही इच्छा!! इतिहास अभ्यासक मित्रपरिवाराने अभिप्राय/लेखातील त्रुटी मला कळवून सुधारण्याची संधी द्यावी.


जावळीच्या मोरेंची बखर हि चंद्रराव मोरेंबद्दल बरच काही सांगते. मुळ बखरीच्या नकलेची नकल कै. य. रा. गुप्ते यांनी उपलब्ध करून दिली. नकल म्हणजे मुळ कागदपत्राची हस्तलिखित प्रत बनवणे (आजची xerox). या बखरीमध्ये चंद्रराव मोरेंच्या घराण्याबद्दल आणि इतर काही मोरे सरदारांच्या नामावली मिळतात.

बखरीची सुरवात कृष्णदेवरायांच्या दरबारी नोकरी करणाऱ्या कुळांच्या यादीने केली आहे. या यादीमध्ये भोंईटे, सुरवे, जाधवराव, कदम, शिंदे, रविराव, भाडवलकर, मोरे, घाटगे, झुंझारराव, नलावडे, सालोंखी, पाटणकर, माने, म्हसवडकर, दहीगांवकर, येलाहुरकर अश्या घरंदाज मराठा घराण्यांची नावे आहेत. इब्राहीम, अलि येदिलशाहा (अली अदिलशहा) आणि बहिरीनिजाम हे राजांकडे नोकरी करत होते. यातील इब्राहीम ला राजाने मेहरबान होउन तेलंगण प्रांत सुभा म्हणून दिला होता. इब्राहीम काही सैन्य घेवून तेलंगणात गेला आणि त्याने त्या प्रांतात आपला अमंल बसवला.

इथे गोलकुंडा (आजचा गोवळकांडा) किल्ला आणि भागानगर शहर यांच्या नामकरणाची सुरस गोष्ट लिहिली आहे. इब्राहीम एकदा मुशी नदीजवळ शिकारीला गेला. तिथे त्याने अन् त्याच्या शिकारी कुत्र्यांनी एका सश्याचा पाठलाग सुरु केला . पाठलाग करता करता एका ठिकाणी ससा मागे फिरला आणि कुत्र्यांवर चालून आला. हा प्रकार पाहून सर्वजण अचंबित झाले. इब्राहीम ने एका ज्योतिषी ब्राह्मणाला बोलवले आणि घडला प्रकार सांगितला. ज्योतिष्याने सांगितले कि हि जागा फार मर्दुमकीची आहे इथे किल्ला बांधा तो अजिंक्य होईल . यावर इब्राहीम ने किल्ला बांधायला मुहूर्त विचारला. मुहूर्त दुस-या दिवशीचाच निघाला. त्या जागेवर एक गोड्या पाण्याची विहीर होती आणि त्याबाजूला एक धनगर आपल्या झोपडीत बायका पोरे आणि बकऱ्यांसह  राहत होता. इब्राहीम ने किल्ल्यासाठी धनगराकडे जागा मागितली . ‘ माझे नाव या किल्याला द्यावे ‘ या अटीवर धनगर तयार झाला. तेलंगणात धनगराला गोलावाडू असे म्हणतात म्हणून या किल्ल्याला गोलकुंडा नाव देण्यात आले.

थोड्या दिवसांनी भागम्मा, एक ब्राह्मण कन्या यात्रेसाठी किल्ल्याच्या जवळून चालली होती. एक ठिकाणी थांबून ती जेवणासाठी शिधा रांधत होती. तिकडे इब्राहीम शिकारीला गेला होता. तो थकला आणि भुकेला होता. त्याने भागम्माकडे जेवणाची विचारणा केली. तो जेवुन आराम केला. त्याने तिला ५०० रुपये आणि सरस वस्त्रे दिली आणि म्हणाला तू मला धर्मबेटी; तुला काय हवे ते माग. भागम्मा म्हणाली तुम्ही किल्ला बांधलाय त्यासमोर एक नगर वसवा आणि त्याला माझे नाव द्या. अशा प्रकारे किल्ल्याजवळ भागानगर उदयास आले.

पुढे इब्राहीम, निजामबहिरी आणि अली येदिलशहा यांनी नमकहरामी केली. रामराजाशी राक्षसतागडी  इथे युद्ध केले. या युद्धात तिघांचा विजय झाला. त्यांनी राजाचे पूर्ण राज्य वाटून घेतले.

 इब्राहीम ने तेलंगना घेतले.

निजामबहिरीने बालेघाट, बीडदेश तहत खानदेश आणि बागलाण घेतले. देवगिरी किल्ला घेउन तिथून पादशहा म्हणून राज्य करू लागला.

अली येदिलशहाने स्वतःची जहागिरी  डोणगिरी बळकावली. विजापूर वसविले आणि पादशहा म्हणून राज्य करू लागला.

राजे गेल्यावर मराठे, पादशहाकडे नोकरी करून मनसबदारी मिळवुन राहू लागले. अश्या मराठ्यामध्ये चंद्रराव मोरे हा विजापुरी चाकरी करत होता.  इथून पुढे बखरीत चंद्रराव मोरे यांची हकीकत सुरु होते.

चंद्रराव मोरेंची ओळखच बखरकार वाघाच्या शिकारीच्या प्रसंगातून करवून देतो. विजापूरच्या डोणप्रांती पातशहा शिकारीला गेला होता. शिकारीला एक वाघ कोणालाच दाद देत नव्हता. तेव्हा चंद्रराव मोरे वाघाला मारायला पुढे सरसावतात. या प्रसंगाचे वर्णन सुरेख केले आहे. वाघ समोर आल्यावर मोरे म्हणतात ‘उठ कुत्र्या बसलास काय. तू आमचे एक कुत्रे आहेस !’. यातून बखरकाराने  चंद्ररावच्या  ‘मर्द आदमी, आडेल शिपाई, आजदादेघरचा राउत मर्दाना ‘ या विशेषणातुन दर्शवलेली रग दिसते. शेवटी वाघासोबतच्या रणात मोऱ्यांचा विजय होतो. बादशाह चंद्ररावाना इनाम मागायला सांगतो. चंद्रराव मुऱ्हे प्रांतातली जावळी आणि राजे हा किताब मागतात. बादशाह मागितलेला इनाम देतो आणि सोबत हत्ती, घोडा, कडी, मोतियांची जोडी  देतो.

पण चंद्रराव हुशार; इतक्यावर थांबत नाहीत. मोरे म्हणतात आता आम्ही राजे पण आमची भावकी, नातेवाईक आमच्या तोलामोलाचे नाही राहिले. आम्ही सोयरिक करायची तर कोणाकडे करावी. असे साधारण कारण पुढे करून बादशाह कडून आपल्या नातेवाईंकाना पदव्या, मानमरातब मागून घेतात. ते सर्व मान पुढीलप्रमाणे :

१२ जणांना ‘राव’किताब : पडेमकर, कुंभारखाणी सुर्वे, सडेकर शिंदे, पाकडे, महामुलकर, गणसावंत, खोपकर, हालमकर हंबीरराव, दलवीरराव, हंबीरराव, येरुणकर , घासेराव चव्हाणराव.

‘राव’ किताब आपल्या भाऊबंदाना : देशकरराव, मुदोसकरराव, कलाकराव, हाटकेटकर, वीरमणकरराव, बिरवाडकर, आस्तनकर, मुधगावकर.

 ६ पुत्रांना खालील मरातबी : प्रतापराव जोरामध्ये, हणमंतराव जावलीमध्ये, गोविंदराव महीपतगडी, चयाजीराव जावळी राज्यासनिध, शिवतरकर यसवंतराव यांना बादशाह कडून हिरवे निशाण आणि दौलतराव (यांना काय दिले ते नमूद नाही )

या सर्व माराताबी आणि इनामे घेउन १२,००० सैन्यासहित चंद्रराव मोरे जावली वर चालून गेले. जावळी काबीज झाली. मोऱ्यानी तिथे राजगादी सुरु केली. पुढे हि गादी ८ पुरुषांकडून चालवली गेली असे संकेत लिहिलेत (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष). त्या ८ पुरुषांची नावे अशी : चयाजी राजे, भिकाजी राजे, शोदाजी राजे, येसाजी राजे, गोन्दाजी राजे, बाळाजी चंद्रराव राजे आणि दौलतराव राजे. यानंतर बखर उत्तरार्धात येते. उत्तर्राधात  चंद्रराव मोरे आणि शिवाजी राजे भोसले यांचा प्रसिद्ध पत्र सवांद आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तळकोकण, बारा मावळे, मुऱ्हे स्वराज्यात आणले आणि आपला रोख जावळीकडे वळवला. महाराजांकडून चंद्ररावला पत्र सुटले

तुम्ही मुस्तफद राजे म्हणविता . राजे आम्ही. आम्हा श्रीशम्भूने राज्य दिधले आहे. तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नौकर होवून आपला मुलुख खावून, हामराहा चाकरी करावी. नाहीतर बदफैल करून फंद कराल, तर जावळी मारून तुम्हास कैद करून ठेवू.

यावर कृष्णाजीराव  मोरे यांचे उत्तर आले असे :

 तुम्ही काल राजे जाहला. तुम्हास राज्य कोणे दिधले? मुस्तफद राजा आपले घरी म्हंटलीयावर  कोण मानितो? येत जावली, जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत जाणार  नाही. तुम्हामध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक याल तर आजच यावे. आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर, त्याच्या कृपेने राज्य करितो. आम्हा श्रीचे कृपेने पातशाहाने राजे किताब, मोरचेल, सिहासन  मेहेरबान दिधले. आम्ही दॆमि दरपिढी राज्य जावळीचे करितो. तुम्ही आम्हासी खटपट कराल, तर पष्ट समजून करणे. आणखी वरकड मुलुख तुम्हास आहे. येथे उपाय कराल तर  अपाय होईल. यश न घेता अपयशास पात्र होवून जाल. 

हे उत्तर वाचून शिवाजीराजे परम संतप्त झाले. त्यांनी प्रतिउत्तर पाठवले कि :

जावली खाली करून, राजे न म्हणोन, मोरचेल दूर करून, हात रुमाले बांधून, भेटीस येवून हुजुरची काही चाकरी करणे. इतकीयावर बदफैली केलिया मारले जाल. 

पत्र वाचून चंद्रराव मोरे खवळले. त्याने उत्तर पाठवून दिले:

दारूगोळी मह्जूद आहे. काही बेजबाबस खुते घालून लिहिले, ते कासियास ल्याहावले? थोर समर्थ असो. 

यावर शिवाजी राज्यांनी सूर्यराव काकडेसह २००० सैन्य जावळीवर पाठीवले. १ महिना युद्ध झाले. मग चंद्रराव, कृष्णाजी बाजी मोरे जावळी सोडून  रायगडावर गेले. रायगड ३ महिने झुंजविला. ३ महिन्यांनी मोऱ्यांनी माघार घेतली. सल्ला झाला. शिवरायांनी कृष्णाजी आणि चंद्रराव यांना घोडा, सिरपाव  आणि रुमाल देवू केला. दोघांनी रुमाल स्वीकारला नाही. शिवरायांनी चंद्ररावाचा मोरचेल दूर सारला.

पुढे शिवरायांच्या मनात मानस आला कि चंद्ररावाला जुजबी शिबंदी देउन स्वराज्याचा नोकर या नात्याने जावळी सांभाळायला देवू.  त्यासाठी त्यांनी चाकणला कृष्णाजी मोरेसोबत भेट ठेवली. दरम्यान कृष्णाजीने मुधोळकर वेंकाजी राजे घोरपडे यांच्यासोबत संधान साधले. आपल्या सुटकेसाठी त्यांना पत्रे लिहिली. हि सर्व पत्रे शिवाजी महाराजांच्या डाकेने पकडली. कृष्णाजी मोरेची हि फितुरी शिवरायांना समजल्यावर त्यांनी त्याची चाकणला गर्दन मारली (शिरच्छेद केला).

चंद्ररावांचे राज्य धर्मात्मा जावळीकर करत असताना राज्याचे उत्पन्न कसे वापरले जात होते याची नोंद आहे. १ हिस्सा शिबंदी आणि हशमांसाठी, एका हिश्शाची अन्नछत्रे आणि धर्मदान, एका हिश्शाचा खाजगी खर्च, पागा, सुरातखाना वगैरे. आणि एका हिस्सा धर्मास्थळांसाठी.  मोऱ्यानी ७ शिवपु-या वसवल्या. ‘असे धर्मराजे मोरे जाहले’ या शब्दात बखरकार मोरे राजांचे कौतुक करतो. बखरीत शेवटची नोंद आहे ती जावळीच्या वर भोरप्या डोंगरावर शिवरायांनी प्रतापगड बांधल्याची आणि त्यावर श्री तुळजापूर अंबेची स्थापना केल्याची.  परंतू चंद्ररायाची कीर्ती जग चहात  आहे या शब्दात बखरीचा शेवट आहे.

सदर लेख मी माझ्या gadkot.in ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आता गडकोट.इन डोमेन नसल्यामुळे इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
श्रीकांत लव्हटे | www.gadkot.in | इतिहासातील दुर्ग, दुर्गांतील इतिहास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *