राज्याभिषेक सोहळा

उद्या जेष्ठ शुध्द त्रयोदशी !! श्री शिवराज्याभिषेकदिन !! शिवशक प्रारंभ !! महाराष्ट्राच्या नव्हे अवघ्या हिंदुस्थानच्या इतिहासातील सोन्याचा दिवस !!

जेधे शकावलीतील राज्याभिषेकाची नोंद

ब-याच जुन्या गोष्टींना एक नवीन वळण या दिवशी लागले. नवीन शक सुरु झाले. चारी बाजूला शत्रु असुनही एक सकळ मंगळ सोहळा संपन्न झाला. सर्वांनी जाणता राज्याचे सार्वभौमत्व मान्य केले होते. आजची सकाळ नवा उत्साह घेउन आली होती. आज सह्याद्री नभोमंडळाला वेगळीच झळाळी आली होती. आज जिजाऊंचे शिवबा ‘छत्रपती’ झाले होते! आज मावळ्यांचे शिवबाराजे ‘छत्रपती’ झाले होते! आज श्री शिवराय छत्रपती झाले होते !!!!!!

जेस्ष्ट श्रुध १२ श्रुक्रवार घटी २१ पले ३४ वी ३८/४० सी ४२ तीन घटिका रात्र उरली तेव्हां राजश्री सिवाजी राजे भोसले सिंव्हासनी बैसले

जेधे शकावली वरील शब्दात राज्याभिषेकाची नोंद करते. या तिथीबद्दल विजयराव देशमुखांनी त्यांच्या ‘शककर्ते शिवराय’ या पुस्तकाल सुंदर विवेचन दिले आहे. ते म्हणतात – हि नोंद सूर्योदयात तिथी गणनेने दिली आहे. पंचांगानुसार सूर्योदयानंतरच पुढील तिथी व वार मोजतात. उलट इंग्रजी तारीख व वार मात्र रात्री १२ नंतर बदलतो. त्यामुळे लौकिकात राज्याभिषेक मुहूर्त शनिवार ६ जुन १६७४ ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी असा समजला जातो. वस्तुस्थीती अशी आहे की, व्दादशी शुक्रवारी २२ घटी ३५ पळे होती. त्यानंतर त्रयोदशी शनिवारी १९ घटीका ४९ पळे होती. म्हणजे सिंहासनारोहण व्दादशीला तर राजदर्शन त्रयोदशीला झाले. सारांश, सिंहासनारोहण विधी शनिवार ६ जुन रोजी सुर्याेदयापुर्वी सुमारे १ तास २० मिनीटे म्हणजे पहाटे ५ च्या सुमाराला झाला. हिंदू पंचांगानुसार अर्थातच सूर्योदयापुर्वी शुक्रवार समजला पाहिजे.

सभासद बखर खालील शब्दात राज्याभिषेकाबद्दल सांगते –

या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा. म-हाठा पातशाह येवढा छत्रपती जाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.

शिवपुर्वकाळ व शिवकाळ अभ्यासल्यावर ही गोष्ट सामान्य का नव्हती हे सहज पटेल. असा हा सोनियाचा दिनू ! सर्व मावळ्यांचे, शिवप्रेमीेचे लक्ष उद्या रायगडी असेल. जे तिथे उपस्थीत असतील ते भाग्यवान पण जे नसतील त्यांची मनेसुध्दा उद्या रायगड चढतील. नंदादीपासारखा हा रायगड आयुष्यात एकदातरी पहावाच. पण त्यावर मी हे ही म्हणेन की रायगडीचा राज्याभिषेकही अनुभवा!

सदर लेख मी माझ्या gadkot.in ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आता डोमेन नसल्यामुळे इथे पुनर्प्रकाशित केलाय.
www.gadkot.in | इतिहासातील दुर्ग, दुर्गांतील इतिहास

सोबत काही क्षणचित्रे २०१३ च्या राज्याभिषेक सोहळ्याची-

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *