इतिहासाचा अभ्यास आणि विपर्यास कसा होतो याचे मोजक्या शब्दात सुदंर वर्णन वा. सी. बेंद्रे यांनी केले आहे. कालांतराने इतिहासातील गोष्टींचा विसर आणि मग विपर्यास कसा होतो या गोष्टी ध्यानात ठेवून इतिहासाचा अभ्यास व्हावा. इतिहास संशोधन करताना शत्रुपक्षांची हकीकत सुद्धा कशी महत्वाची असते. इतिहास अभ्यासकानी इतिहास निपक्ष वृत्तिने अभ्यासावा. अश्या बऱ्याच गोष्टींचा उलघडा या लेखात केला आहे. त्यांच्या ‘गोवळकोंडयाची कुत्बशाही‘ या पुस्तकातील हा लेख फारच मुद्देसुद आहे. हा लेख जसाचा तसा पुढे देत आहे.
कोणत्याही प्रसंगाच्या काळाचा विस्मर त्वरित होतो. हा विस्मर होण्यास लागणारा कालावधी प्रसंगाच्या महत्वाच्या प्रमाणावर कमी अधिक असतो इतकेच. स्थलनामांचे अथवा व्यक्तिनामांचे विस्मरणही कालावधिने होते. काळाचा विस्मर एका पीढित झालेला दिसतो तर स्थलनामांचे आणि व्यक्तिनामांचे तपशील दोन तीन पिढ्यात विसरले जातात. त्यामुळे ऐतिहासिक प्रसंगांचे तपशील विपर्यस्त होऊ लागतात व शेवटी ते वस्तुस्थितीला धरून नसलेले आढळून येतात. उदाहरणार्थ अब्दुल हसनचा राज्यावर येण्याचा प्रसंग. स्थलकालांचा वास्तविक बोध न झाल्यामुळे त्यात अगदी असंभाव्य असा मजकूर इतिहास म्हणून रूढ झाला आहे. स्थलकलांचा बोध जितक्या प्रमाणात बिनचुक होवू शकेल तितक्या प्रमाणात प्रसंगाच्या कार्यकरणभावांची उपपत्ति निर्दोष राहील. ते प्रसंगचित्र सुबोध व वस्तुस्थितिस धरून झाल्यास इतिहासरचनेत पूर्णत्व आणि प्रमानत्व साधेल. जसे स्थलकालनिर्देशाच्या अभावी निरनिराळ्या वेळी व स्थळी घडलेले अनेक प्रसंग एकाच प्रसंगचित्रात रेखाटले जातात. तशीच काही प्रसंगाची द्विरुक्ति झालेली आढळते. अर्थात अश्या प्रकारचे दोष काढून टाकनन्याचाच इतिहासरचनेत व संशोधनात मुख्य प्रयन्त करावा लागतो. एकांगी मजकुरातील स्थलकालांचे दुर्बाेधत्वाचे प्रमाण अधिक असते. हे प्रमाण विरोधी पक्षकडील अगर संबंधीय माणसे किंवा राज्ये यांच्याकडिल हकीकतेने बरेचसे कमी करता येते. उदाहरणार्थ, अबुल हसनची शेवटची हकीकत मोगल सरदार जितकी बिनचुक देतील तितकी ती गोवळकोंडयाच्या लोकांना देता येणार नाही. सारांश, स्वदेशाचा अगर स्वराष्ट्राचा इतिहास लिहिताना शेजारील सर्व राज्यांचा इतिहास फार बारकाइने तपासने जरूर पड़ते. शिवकालीन मराठ्यांच्या इतिहासास विजापुरची आदिलशाही, गोवलकोंडयाची कुत्बशाही व हिन्दुस्थानची मोगलपातशाही यांच्या व कर्नाटकातील हिंदु राजांच्या इतिहासाचे आणि विशेषतः ऐतिहासिक साधनांचे परिशीलन होने आवश्यक आहे. तत्कालीन परिस्थिति, अंतर्गत राजव्यवस्था, सामाजिक व व्याहवारिक उत्क्रांत्या, राजराजांचे परस्पर संबध, राजव्यवस्थेचे व आर्थिक बाबींचे परस्परांवर झालेले परिणाम इत्यादि सर्व गोष्टिचा चांगला अभ्यास झाला पाहिजे. वास्तविक दक्खनि शाह्यांचा सामर्थ्याचा जितका स्पष्ट बोध होईल तितका मराठ्यांच्या चिकाटीचा, सामर्थ्याचा व राज्यकारभारातील कार्यतत्परतेचा चांगला व बिनचुक कयास बांधता येईल. अंधश्रद्धा व वॄथाभिमान धरून एकांगी वृत्ती ठेवल्याने स्वदेशाचा इतिहास नुसताच सदोष राहतो असे नाही तर त्यात गौणत्वही आणले जाते. उदाहरणार्थ, छत्रपतींची साक्षरता सिद्ध करण्यासाठी एखाद्या पांड दिड-पांडच्या शुल्लक निवाद्याची खर्डेघाशी लादन्यात जसा छत्रपतींच्या कार्यक्षमतेवर अप्रत्यक्षपणे आघात केला जातो, तसेच त्यांच्या राज्यकारभाराची मर्यादा कल्पनातीत संकुचित केली गेल्याने किंवा सबंध हिंदुस्थान जिंकनारा व सांभाळणारा ‘अवरंग’ शिवाजीपुढे क:पदार्थ मानल्याने शिवाजीची योग्यता चिकित्सक माणसास कमी झालेली दिसते. उलट, शत्रुपक्षीय सामर्थ्याचा निखालसपणे बोध करून दिल्यास स्वसामर्थ्यतील तरतम प्रकार उज्वलपणेे लक्ष्यात येवू शकतो व अपयश हे शक्ति व बुद्धि मोजन्याचे माप ठरत नाही. यामुळे इतिहास संशोधनाचे व रचनेचे क्षेत्र जसे विस्तृत ठेवावे लागते, तसेच ते पूर्वग्रहप्रेरित व भेदभेदपूर्ण असता कामा नये. अश्या अभ्यासात संशोधक सोयीप्रमाणे आपल्या अभ्यासातील दृष्टी व क्षेत्र ही विषयकालानुसार संकुचित ठेवतो. त्यामुळे इतर अभ्यासकांस काहि गैरसोय होण्याचा संभव असतो. परंतु त्याच्या अभ्यासातील क्षेत्रमर्यादेमुळे त्याच्या कार्यात पूर्णत्व व प्रमाणत्व साधले जाते व एकंदरित इतिहास लेखनात प्रगतिच झालेली असते, हे गैरसोईमुळे क्षुब्ध झालेल्या अभ्यासकांसहि थोड्याश्या विचारांति व स्वकार्याच्याही पुनर्निरीक्षणाने सहज समजून येण्यासारखे आहे.
लेखक : वासुदेव सीताराम बेंद्रे
“गोवळकोंडयाची कुत्बशाही”
भारत इतिहास संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला ग्रंथांक ३९
सदर संकलन माझ्या ब्लॉगवर (gadkot.in) प्रकाशित केले होते. आता गडकोट.इन डोमेन नसल्यामुळे इथे पुनर्प्रकाशित केले आहे.
शब्दांकन : श्रीकांत लव्हटे । www.gadkot.in | इतिहासातील दुर्ग, दुर्गांतील इतिहास