धारकरी – रायगड प्रदक्षिणेचा

१२ जानेवारीची सकाळ… हिरकणी ग्रुप ऑफ पनवेल आयोजीत रायगड प्रदक्षिणा मोहीमेतील आम्ही सर्व ठरल्याप्रमाणे चित् दरवाज्याखाली जमलो होतो. रायगडच्या सकाळच्या रुपाची साठवण जो तो आपल्या कॅमे-यात करत होता. खामकर बंधुनी घरुन येताना भगवा ध्वज आणला होता. कालच्या तळागड ट्रेकमधे सापडलेली काठी होतीच.. लगेच आम्ही भगवा काठीला लावला. आणि भगवा फरफरवला..!!!!

कालच्या तळागड ट्रेकमधे सापडलेली काठी होतीच.. लगेच आम्ही भगवा काठीला लावला. आणि भगवा फरफरवला..!!!!

सगळ्यांची जमवाजमव करुन किरण शेलारदादा सगळ्यांना रायगड प्रदक्षिणेची माहिती देउ लागले. माहिती झाल्यावर प्रश्न आला “भगवा कोण पकडणार?” मी लगेच होकार दिला. भगवा घ्यायचा तेही रायगडच्या घे-यात!! मग यात विचार कसला…होकारच !! आता किरण धारक-याची माहिती देउ लागला. युध्दात सेनेच्या अग्रस्थानी राजध्वज घेउन असतो तो धारकरी. राजध्वजाचा मान तो त्याचा मान. प्राणपणाने त्याने ध्वज जपायचा. ध्वज खाली पडु नाही द्यायचा. रणक्षेत्री प्राण गमवावे लागलेच तर स्वत: पडण्याआधी ध्वज दुस-याच्या हाती देउनच देह ठेवावा.

मनोमन ठरवले आता आपण रणक्षेत्री नाही पण भगव्याचा मान, धाकर-याचा मान राखलाच पाहीजे. किरणची सुचना आली धारक-याने घोषणा द्यावी… दिली..

प्रौढप्रताप पुरंदर… क्षत्रियकुलावतंस…गोब्राम्हणप्रतिपालक… सिंहासनाधिश्वर…राजाधिराज…श्री श्री श्री…छत्रपती शिवाजी महाराज की जय SSS हर हर महादेव SSS हर हर महादेव SSS जय भवानी, जय शिवराय SSS

झाली.. रायगड प्रदक्षिणा सुरु झाली. ठरल्याप्रमाणे झेंडाधारी किरण सोबत मोहिमेच्या अग्रस्थानी चालणार. बाजुला शिवरायांचा नंदादीप ‘रायगड’, वाटेवर इतिहासाची आठवण करुन देणारी ठिकाणे, हातात भगवा, सोबतीला सगळे डोंगरमित्र…..मन सह्याद्रीत, इतिहासात हरवले… महाराष्ट्र संतांची भूमी, वारक-यांची भूमी… त्यांचा ध्वज भगवा.. हाच भगवा शिवरायांनी आपल्या स्वराज्याचा ध्वज केला.. याच भगव्याखाली मावळे जमले, लढले. वारकरी धारकरी झाले. याच भगव्याने रायरीचा रायगड केला. हाच भगवा पेशव्यांनी अटकेपार नेला… भगवा आहे प्रतिक ज्वाज्वल्यतेचा, स्फुर्तीचा, बलिदानाचा, अभिमानाचा, मावळ्यांनी सांडलेल्या आसूडाचा…!! म्हणूनच भगवा हातात घेतला की एक विलक्षण ऊर्जा मिळते.. मग तो कोणीही असो भगवा आकाशात फिरवल्याशिवाय रहात नाही. क्वचीतच तुम्हाला दिसेल की भगवा हातात घेउन कोणी शांत उभा आहे.

भगवा ध्वज हातात घेउन रायगडच्या घे-यात चालत होतो.
खिंडीच्या शेवटलाच उभा राहुन भगवा उंच धरुन फिरवला !!

असा हा भगवा ध्वज हातात घेउन रायगडच्या घे-यात चालत होतो. विश्रामाच्या टप्प्यांनंतर क्वचितच कोणी चुकुन पुढे गेला तर थांबांयचा नि हाकारायचा “धारकरी पुढे या”. हा माझा मान? छे.. हा मान भगव्याचा !! टकमक टोक, हिरकणी टोक, भवानी कडा यांच्या खालुन, वाघोली खिंड, काळकाईची खिंड यातुन हातात भगवा घेउन रायगड प्रदक्षिणा…  एक विलक्षण अनुभुती… विश्रामाच्या टप्प्यांना बसल्यावर, खाताना ध्वज खाली ठेवला नाही.. मस्त वाटले…

काळकाईच्या खिंडीनंतर प्रदक्षिणेची सांगता झाली. चालुन दमछाक झालेली पण शेवटी भगवा फिरवायचा मोह आवरता आला नाही. खिंडीच्या शेवटलाच उभा राहुन भगवा उंच धरुन फिरवला !! मागे क्षितीजावरुन वाघ दरवाजा आम्हा सगंळ्यांना कौतुकाने पहात होता !!!

सदर लेख मी माझ्या gadkot.in ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आता गडकोट.इन डोमेन नसल्यामुळे इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
श्रीकांत लव्हटे | www.gadkot.in | इतिहासातील दुर्ग, दुर्गांतील इतिहास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *