महाराष्ट्राचा भूगोल गडकोटांमध्ये गुंफून शिवछत्रपतींनी या मातीला चिलखत घातले. मराठ्यांच्या इतिहासात गडकोटांना अनन्यसाधारण महत्व आहे. सह्याद्रीतल्या या महाराष्ट्राच्या दुर्गवैभवाबद्दल रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी आपल्या “मराठी रियासत”च्या पहिल्या खंडाच्या समालोचनेत सुंदर लिहिले आहे.
रायगड किल्ल्यावर शिवाजीने आपली राजधानी केली. कर्नाटक प्रांत जिंकुन जिंजी किल्ला ताब्यात ठेवण्यात त्याने अतिशय श्रम व खटपट केली, तो जिंजी किल्लाच भावी प्रसंगी मराठ्यांचे राज्य बचावण्यास समर्थ झाला. साता-याची मजबूदीही अशाच प्रकारची होती. मोठमोठ्या किल्ल्यांच्या संबंधाने अत्यंत रसाळ, स्वाभिमानसंंवर्धक व कविगुणपरिक्षक असे अनेक प्रसंग महाराष्ट्रेतिहासात घडले. सिंहगडाने तानाजी मालुस-यांचे नाव अबालवृध्दांच्या तोंडी आणून दिले आहे. जिंजीवासाने तर मराठ्यांचा खरा अभिमान कसासच लाविला. प्रतापगडाचे नाव निघाल्याबरोबर अफजलखानावर शिवाजीने मिळवलेल्या विजयाची आठवण कोणास होणार नाही. बागलाणातींल सालेर व पट्टा या किल्ल्यांनी मराठ्यांच्या धनप्राप्तीस किती हातभार लाविला ! सन १६७१ च्या धुळवडीच्या रात्री राजापुरीच्या जंजी-यावर सिध्दीने उडवून दिलेल्या कल्लोळाने रायगडावर शिवाजी दचकून उठला, त्या प्रसंगाचे वर्णन करणारा बायरन अगर मूर आपल्यात निपजने आहे. थर्मापीलीचे साम्य पावलेला खेळणा व तेथे आपले प्राण खर्ची घालुन शिवाजीस वाचीवणारा स्वामीभक्त बाजीप्रभु यांची आठवण बुजणे शक्य आहे का! दिलीरखानास ‘दे माय धरणी ठाय’ करण्यास लावणारा मुरारबाजी व पुरंदर ही नावे महाराष्ट्र विद्यार्थ्याच्या मुखी घोळत असली पाहीजेत. पन्हाळा व खेळणा उर्फ विशाळगड हे तर प्राचीन काळापासुन राष्ट्राचे रक्षण करण्यात सदैव निमग्न आहेत. अलिबाग व मालवण येथील जंजिरे शिवाजीच्या आरमाराचे केवळ आदिस्थान होत. तसेच जेथे शिवाजीचा जन्म झाला तो शिवनेरी किल्ला त्या प्रभूच्या नावाची आठवण लोकांस नेहमी करुन देईल यात संशय नाही. सारांश, अशा नामांकीत किल्ल्यांच्या योगाने महाराष्ट्र इतिहासास एक प्रकारचे विलक्षण रमणीय स्वरुप प्राप्त झाले आहे. प्रत्यक्ष शिवाजीस या किल्ल्यांचे इतके महत्त्व वाटत होते की ‘किल्ले बहुत झाले, पैका विनाकारण खर्च होतो’ , असा जवळच्या मंडळींनी शिवाजीस अर्ज केला असता तो म्हणाला, ‘जैसा कुळंबी शेतास माळा घालुन शेत राखितो, तसे किल्ले राज्यास रक्षण आहेत. तारवांस खिळे मारुन बळकट करितात, तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे. किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्याची उमर गुजरुन जाईल’ ,’आपणांस धर्मस्थापना व राज्यसंपादन करणे. सर्वांस अन्न लावून, शत्रुप्रवेश न होय, ते किल्ल्यांमुळे होतो. सर्वांचा निर्वाह आणि दिल्लिद्रासारखा शत्रु उरावार आहे. तो आला तरी नवे जुने तीनसे साठ किल्ले हजरतीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला, तरी तीनसे साठ वर्षे पाहिजेत.’
समालोचना – खंड १
“मराठी रियासत
गोविंद सखाराम सरदेसाई
सदर लेख मी माझ्या gadkot.in ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आता गडकोट.इन डोमेन नसल्यामुळे इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
श्रीकांत लव्हटे | www.gadkot.in | इतिहासातील दुर्ग, दुर्गांतील इतिहास